सावधान… निमगावात बिबट्याचे आगमन तज्ञांचे ठाम मत, परिसरातील लोकांनी काळजी घ्यावी

वनरक्षकासह वनमजुरांची घटनास्थळी पाहणी
भूमिपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथे निमगाव – मळोली रस्त्यालगत मंगळवार दि 6 जून रोजी रात्री 8.30 वा सदाशिव नारायण मिसाळ व उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्या शेताजवळ वेळापूर येथील इसमास बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ,राजेश आडत रा. वेळापूर हे आपल्या कुटुंबासह चार चाकी गाडीतून कुसमोड येथील शेतातून वेळापूर येथील आपल्या राहत्या घराकडे जात असताना निमगाव- मळोली रस्त्यालगत सदाशिव नारायण मिसाळ यांच्या शेताजवळ रात्री 8.30 वाजता त्यांना बिबट्या सदृश्य प्राणी दिसला यानंतर त्यांनी खात्रीपूर्वक या प्राण्याला पाहिल्यानंतर तो बिबट्या आहे असे त्यांचे ठाम मत झाले यानंतर तेथून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवार दि 7 जून रोजी याबाबत त्यांनी स्थानिक लोकांना माहिती दिली असता माळशिरस वनविभागाचे वनरक्षक गणेश जगदाळे हे आपल्या 7 ते 8 वनमजूर कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी आले.

निमगाव चे उपसरपंच नंदकुमार पाटील, दिलीप पाटील, विश्वनाथ मगर, डॉ दत्तात्रय मगर आदी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी बिबट्या सदृश्य प्राण्याच्या ठशांची पाहणी केली सदर प्राण्यांच्या पायाचे ठसे सोशल मीडिया मधून सर्वत्र पसरले यानंतर ठसे तज्ञांच्या माहितीनुसार हे ठसे बिबट्या या प्राण्याचे असून सदर ठशांची लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 8.5 सेंटिमीटर इतकी आहे यामुळे हा बिबट्या नर या जातीचा असून अंदाजे 4 वर्षे वय तर वजन 60 किलोपेक्षा जास्त असण्याची दाट शक्यता असून लांबी अंदाजे 8 फूट इतकी असावी असा अंदाज तज्ञांकडून वर्तविला जात आहे वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणच्या रहिवाशांना धोका आहे यामुळे या भागातील लोकांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये ,बाहेर पडताना समूहाने बाहेर पडावे ,हातामध्ये काठी मोठ्या उजेडाची बॅटरी अथवा मोठ्याने आवाज करत बाहेर पडावे, गरज असेल तरच बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

निमगाव मळवली रोडवर उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्या व सदाशिव नारायण मिसाळ यांच्या शेताजवळ आढळलेल्या पायांच्या ठशावरून हा प्राणी बिबट्या आहे यामुळे सदर परिसरामधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांनी अथवा मोठ्या माणसांनी एकटे फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे .




