माळशिरस- दहिवडी रस्त्याला सीएसआर फंडातून निधी मिळावा; भाजप पदाधिकाऱ्यांचे मंत्री नितीन गडकरींना साकडे
भूमीपुत्र न्यूज
नियोजित तुळजापूर- शिंगणापूर या राष्ट्रीय महामार्गामध्ये बदल व पुनर्नियोजन करून या पुनर्नियोजीत राष्ट्रीय महामार्गात पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांचा समावेश करून हा राष्ट्रीय महामार्ग पंढरपूर तालुक्यातील करकंब ,उंबरे पागे ते माळशिरस तालुक्यातील उंबरे वेळापूर, माळखांबी, उघडेवाडी, वेळापूर ,निमगाव (म) ,तरंगफळ, गारवड ,इस्लामपूर, कन्हेर, लोंढे-मोहिते वाडी, फलटण तालुक्यातील गिरवी ते शिंगणापूर पाटी हा रस्ता नवीन सुधारित पुनर्नियोजित करावा अशा मागणीचे निवेदन माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने फलटण येथे खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले.
फलटण येथे 27 जानेवारी रोजी झालेल्या रस्त्याच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यामध्ये माळशिरस मधील भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले या शिष्टमंडळामध्ये भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी के के पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, बाळासाहेब वावरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, युवराज वाघमोडे, सुनील बनकर ,अमर मगर आदी मान्यवर होते .
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की पुनर्नियोजित राष्ट्रीय महामार्ग झाल्यास या रस्त्यालगत दोन सहकारी साखर कारखाने व नियोजित मुंबई बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर होत असून या रस्त्यामुळे निश्चितच या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे याचबरोबर सोलापूर व सातारा या 2 जिल्ह्यांना जोडणारा व ग्रामीण भागातून जाणारा माळशिरस दहिवडी हा रस्ता माळशिरस, भांबुर्डी, इस्लामपूर, कन्हेर ,इंजबाव घाट, इंजबाव, भालवडी ते दहिवडी हा रस्ता करण्याचेही निवेदन यावेळी देण्यात आले.
यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच सकारात्मक कारवाई करू असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे यामुळे या भागातील लोकांच्या दळणवळणाच्या समस्या सुटणार असल्याने शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत .