शिंदे पिता-पुत्रींवर कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहीते- पाटील यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
भूमीपुत्र न्यूज
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवार दि 10 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे माळशिरस तालुक्यात मारकडवाडी या ठिकाणी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष सतीश पालकर ,युवक तालुका उपाध्यक्ष मयूर माने ,अकलूज शहराध्यक्ष नवनाथ साठे यांच्या हस्ते सुपूर्द केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना 6 पानी पत्र दिले असून या पत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार, शिंदे व खा प्रणिती शिंदे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जोरदार आवाज उठविला असून काँग्रेसची जिल्ह्यात वाताहात करण्याचे काम सुरू असून त्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक तरुण कार्यकर्ते काँग्रेस मधून बाहेर पडत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मध्ये काँग्रेस कडून अनेक जण इच्छुक असतानाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय तर मिळालाच नाही उलट महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना उबाठा गटाचा रोष काँग्रेसवर वाढवून घेतला तीन वेळा आमदार असलेल्या विद्यमान खा प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातून ही काँग्रेसला नामुष्की पत्करावा लागली आहे. पंढरपूर मतदार संघातूनही भगीरथ भालके हे काँग्रेसचे सदस्य नसताना देखील त्यांनाही या दोघांनीच काँग्रेसची उमेदवारी दिली त्या ठिकाणीही काँग्रेसला हार पत्करावी लागली आहे.
सन 2021 ला मी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सलग दोन महिने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढला असून ज्या ठिकाणी गाव भेट दौरा होता त्याच ठिकाणी गाव भेट दौरा संपल्यानंतर मुक्काम करून काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न केले व काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचविली राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा समूह जिल्हाध्यक्ष या नात्याने सहभागी केला, काँग्रेसच्या सभासद नोंदणीतही महाराष्ट्रात अग्रक्रमाने सहभाग नोंदविला असे असताना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी ठरविताना जिल्हाध्यक्ष या नात्याने मला विचारात घेतले नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आदेश असतानाही महाविकास आघाडीचा धर्म न पाळता विरोधकांना मदत केल्याचा आरोप शिंदे पिता-पुत्रींवर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला जर सर्वसामान्य कार्यकर्ता असा वागला असता तर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली असती परंतु या शिंदे पिता-पुत्रींवर काय कारवाई होणार ? काँग्रेस पक्ष मोठा की सुशीलकुमार शिंदे व प्रणिती ताई शिंदे मोठ ,पक्षशिस्त मानायचे की सुशीलकुमार शिंदे व प्रणिती ताई शिंदे यांचा आदेश मानायचा हा गंभीर व घन प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर पडला आहे असाही आरोप डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिकीट वाटपात शिंदे गट अशाच प्रकारे प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय करणार हे चित्र दिसत असल्यामुळे काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल हे मी कदापी सहन करू शकत नाही म्हणून मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे व या राजीनाम्याची प्रत मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व रमेश चनिथाल महाराष्ट्र प्रभारी यांच्याकडेही पाठविले आहे .