जे आवडेल तेच करा… खा सुप्रिया सुळे
पाणीव येथे श्रीराम शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
भूमीपुत्र न्यूज
वर्गात पहिला नंबर आला की तो अव्वल आणि शेवटचा नंबर आला तर तो अपयशी अशी विचारधारा चुकीची असून आपल्याला जे रुचेल पटेल ज्याच्यात सकारात्मकता असेल व विद्यार्थ्यांनी जे आवडेल तेच करावे मात्र आपण घेत असलेल्या शिक्षणाने निश्चितच सामाजिक बदल झाले पाहिजेत असे संसदरत्न खा सुप्रिया सुळे यांनी रविवारी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पाणीव ता माळशिरस येथे श्रीराम शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील,प्रदेश सरचिटणीस शंकर देशमुख,माजी पं स सदस्या श्रीलेखा पाटील, धैर्यशील देशमुख,प्रा लक्ष्मण हाके, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, स्वप्निल वाघमारे,तुकाराम देशमुख,बाळासाहेब धाईंजे,शेखर माने,कविता म्हेत्रे, संस्थेचे सचिव ॲड.अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील,प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविकास आघाडीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा सुप्रिया सुळे म्हणाल्या की , माणूस हा कपड्याने मॉर्डन नाही तर मेंदू ने मॉर्डन असावा लागतो. वेळोवेळी होणारे बदल स्वीकारले पाहिजेत. याचबरोबर आपली संस्कृती ही जपली पाहिजे मात्र ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या बाजूला सारल्या पाहिजेत व आधुनिकतेची कास धरली पाहिजे सोशल मीडियामुळे लोप पावत चाललेले वाचन संस्कृती जपली पाहिजे जितके जास्त वाचन तितके जास्त परिणामकारक समाजापुढे आपणास सादरीकरण करता येते याचा स्व अनुभव त्यांनी यावेळी सांगितला याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी रोखठोक उत्तरे दिली तर श्रीराम शिक्षण संस्थेच्या श्रीराम अंकातील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे वाचन करून संबंधितांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा मान्यवरांसमोर मांडत तीन हजार मतदान असणाऱ्या पाणीव सारख्या ग्रामीण भागात दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नवनाथ नलावडे यांनी मानले .