मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अशी असेल अकलूज मधील सभा…
भूमीपुत्र न्यूज
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर विराट सभा अकलूज येथे शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल वर आयोजित केली असल्याची माहिती सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आली. सकल मराठा समाजाची अकलूज, शासकीय विश्रामगृह येथे मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर देखील समाज बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना पश्चिम महाराष्ट्रातून या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची सर्वांना उत्सुकता लागली असून माळशिरस तालुका सकल मराठा समाज समन्वय समिती यासाठी विशेष परिश्रम घेत आहे.
नियोजन समितीच्या वतीने या सभेसाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आले असून प्रत्येक समितीकडे वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या सभेसाठी सर्व समाज बांधवांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महिला भगिनींसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून (ऑक्टोबर हिट) उन्हाचा कडाका लक्षात घेऊन या ठिकाणी जागेवरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून बाहेरही पिण्याच्या पाण्याचे टँकर असणार आहेत. याचबरोबर अचानक एखाद्याला काही त्रास होऊ लागला तर सभेच्या ठिकाणी 10 डॉक्टरांची टीम तैनात केली असून त्यांच्या मदतीला 6 ॲम्बुलन्स असणार आहेत.सभेसाठी येणाऱ्या बांधवांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था क्रीडा संकुलच्या पाठीमागे असणाऱ्या एमटीडीसीच्या हॉलच्या समोरच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे .सभेच्या अगोदर सकाळी 2 तास शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून या सभेसाठी 500 स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करणार आहेत .सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन व संयोजन समितीच्या वतीने 4 ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले असून पोलीस प्रशासनाची यावर करडी नजर असणार आहे .