माळशिरस तालुकाराजकियसोलापूर जिल्हा

DCC बँक निवडणूक : मोठा राजकीय भूकंप! रणजीतसिंह मोहिते-पाटील, शिंदे, माने, परिचारकांसह दिग्गजांचे अर्ज बाद

भूमीपुत्र न्यूज

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या अर्ज छाननीत मोठी उलथापालथ झाली आहे. कलम 88 आणि 110 अ अंतर्गत सुरू असलेल्या सुनावणीचा परिणाम अनेक दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीवर झाला असून, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक, सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह अनेकांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, बाबासाहेब देशमुख आणि राजेंद्र राऊत यांचे अर्ज मंजूर झाल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली. विशेषतः कलम 88 अंतर्गत आर्थिक जबाबदारी निश्चिती आणि कलम 110 अ अंतर्गत प्रशासकीय समितीशी संबंधित बाबींमुळे काही उमेदवारांचे अर्ज राखून ठेवण्यात आले होते. या अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित तरतुदींअंतर्गत हरकती असलेल्या उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

बाद झालेल्या उमेदवारांमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, जयवंत जगताप, दिलीप माने, प्रशांत परिचारक, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, रश्मी बागल आणि बबनराव आवताडे यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अनेक राजकीय घराण्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.मात्र, प्रमुख नेत्यांचे अर्ज बाद झाले असले तरी त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, शंभूराजे जगताप, बाळराजे पाटील, प्रणव परिचारक, सिद्धेश्वर आवताडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील आणि यशवंत शिंदे यांच्यासह अनेक उमेदवारांच्या माध्यमातून राजकीय घराण्यांनी आपले अस्तित्व टिकवण्याची तयारी केली आहे. रश्मी बागल यांनी आई शामल बागल यांना महिला राखीव मतदारसंघातून संधी दिली आहे.दुसरीकडे मंजूर अर्जांमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा समावेश आहे. तसेच राम सातपुते, शहाजीराजे देशमुख, रणजितसिंह शिंदे आणि बाबासाहेब पाटील यांच्या अर्जांवरील हरकतीही फेटाळण्यात आल्या आहेत.या निकालातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अर्ज बाद झाला असला, तरी त्यांचे बंधू खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा अर्ज मंजूर झाला आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची पुढील रणनीती काय असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे शिंदे, माने, पाटील आणि परिचारक कुटुंबातील पुढील पिढी आता निवडणुकीत कितपत प्रभाव दाखवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची संधी आहे. त्यामुळे हा निर्णय अंतिम राजकीय चित्र ठरवणारा ठरणार की अपील प्रक्रियेतून काही उमेदवारांना दिलासा मिळणार, याची उत्सुकता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता दिग्गज नेत्यांच्या थेट उमेदवारीपेक्षा त्यांच्या समर्थकांची आणि पुढील पिढीची ताकद निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!