अकलूज आरटीओच्या तपासणी पथकाची तत्परता; अपघातग्रस्तांना मिळवून दिली जीवदान देणारी मदत

भूमीपुत्र न्यूज
दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अकलूज आरटीओ कार्यालयाच्या तपासणी पथकाने दाखवलेल्या मानवी व कर्तव्यदक्ष दृष्टिकोनामुळे एका भीषण अपघातातील जखमी तरुणांना तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली आहे.
शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास माळशिरस-वेळापूर रस्त्यावर वेळापूर जवळ आरटीओ कार्यालयाचे तपासणी पथक गस्तीवर असताना, त्यांना एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी विनवणी करताना आढळला. पथकातील अधिकाऱ्यांनी कोणतीही वेळ न घालवता त्वरित आपले वाहन थांबवले.पडताळणी केली असता, मोटार वाहन क्रमांक MH14FS4864 हे रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये पलटी झाल्याचे निदर्शनास आले.
या वाहनाजवळ आणखी एक तरुण अतिशय गंभीर व अत्यावस्थ अवस्थेत पडलेला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासणी पथकाने तातडीने पावले उचलली.घटनास्थळाची गरज ओळखत अधिकाऱ्यांनी त्वरित:आपत्कालीन रुग्णवाहिका (क्रमांक १०८) आणिमहामार्ग मदत क्रमांक (१०३३) वर संपर्क साधून दोन्ही रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून घेतल्या.कारमधील चारही जखमी तरुणांना पुढील उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात तातडीने रवाना करण्यात आले.मदतकार्य करत असताना वाहनातील एका कागदपत्रावरून सदर तरुण हे जत, जिल्हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, रस्त्यावर अपघात झाल्याचे पाहून पाठीमागून येणारे काही वाहनचालकही मदतीसाठी थांबले. सुदैवाने, त्यापैकी दोघेजण जतचेच असल्याचे समजले. त्यांच्या सहकार्याने अपघातग्रस्त युवकांच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती कळविण्यात आली.हे संपूर्ण मदतकार्य स्थानिक नागरिक व पोलिसांच्या सहकार्याने, आरटीओ कार्यालय प्रमुख संदीप मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी लाळगे,सहायक मोटार वाहन निरीक्षक कांतीलाल गरगडे,वाहन चालक बाबू झणझणयांनी अत्यंत प्रशंसनीय रीतीने पार पाडले. त्यांच्या या समयसुचकतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.




