नातेपुते येथे शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानतर्फे ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन; ५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भूमीपुत्र न्यूज
येथील शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रायोजकत्व मामासाहेब पांढरे मित्र मंडळाने स्वीकारले आहे.
शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला बालचमूंचा उदंड प्रतिसाद लाभला असून, आजअखेर ५० स्पर्धकांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात आले नव्हते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यास ५,००० रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकास ३,००० रुपये व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकास २,००० रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, उत्तेजनार्थ १,००० रुपयांची दोन बक्षिसे आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, प्रायोजक मामासाहेब पांढरे मित्र मंडळाच्या विशेष सहकार्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालस्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांची सफर घडवून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या परीक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी नामवंत इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर, चंद्रशेखर शिवगुंडे आणि मंगेश दीक्षित यांनी स्वीकारली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी किशोर पलंगे, श्रीगणेश पागे, मंगेश दीक्षित, विवेक राऊत, शशी कल्याणी व धनंजय पवार हे विशेष परिश्रम घेत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील राऊत यांनी दिली.
शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने १९८२ पासून सलग शिवव्याख्यानमालेचे अत्यंत दिमाखात आयोजन करण्यात येते. या उपक्रमातून प्रतिष्ठानने वैचारिक व सांस्कृतिक वारसा जपला असून, ‘किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमध्ये इतिहास व गड-किल्ल्यांबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.




