पिलीवसारख्या ग्रामीण भागातून तमसिन शेखची आंतरराष्ट्रीय झेप; एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

भूमीपुत्र न्यूज
अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्रीवर मात करत पिलीवसारख्या छोट्याशा ग्रामीण भागातून तमसिन शेख हिने आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रोप्य पदक पटकावत देशाचा तिरंगा उंचावला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यासह पिलीव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिची आगामी एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गावात पूर्वी कोणालाही परिचित नसलेल्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील ‘तायक्वांदो’ या खेळाची ओळख वाजिद शेख सर यांनी गावकऱ्यांना करून दिली. क्रीडा क्षेत्रातील आवड जपत त्यांनी सुरुवातीला कराटेचे वर्ग घेतले आणि अनेक होतकरू खेळाडूंना कराटे चॅम्पियन घडवले. त्यानंतर त्यांनी तायक्वांदोचे प्रशिक्षण सुरू केले. मात्र, सुरुवातीच्या काळात अपेक्षित प्रतिसाद व प्रवेश मिळण्यात अनेक अडचणी आल्या.
अशा खडतर काळात वाजिद शेख यांनी खचून न जाता आपल्याच कुटुंबातील मुलींना तायक्वांदोचे धडे देण्यास सुरुवात केली. आपल्यापैकी निदान एका तरी मुलीने राष्ट्रीय स्तरावर खेळावे, असे त्यांचे स्वप्न होते. ज्याप्रमाणे महावीरसिंग फोगट यांनी आपल्या मुलींना घडवून स्वप्न पूर्ण केले, अगदी तसाच संघर्ष आणि जिद्द वाजिद सरांनी दाखवली. त्यांच्या कन्येने—तमसिन शेख हिने—अफाट मेहनत व जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रोप्य पदक मिळवत वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले.
तमसिनच्या या देदीप्यमान यशामागे तिची आई करिष्मा, तसेच कुटुंबातील सर्व सदस्य, दोन्ही चुलते आणि चुलत बंधू यांचा खंबीर पाठिंबा व मोलाचा वाटा राहिला आहे. प्रत्येक टप्प्यावर कुटुंबीयांनी दिलेली साथ आणि प्रोत्साहनामुळेच तमसिन ही झेप घेऊ शकली.
आंतरराष्ट्रीय पदकापाठोपाठ आता तिची एशियन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाल्याने पिलीव व परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




