सोलापूर ऊसदर बैठक आज रात्रीच; निर्णय न झाल्यास उद्यापासून बेमुदत ‘रेल रोको’ व महामार्ग बंद ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री ९ वाजता तातडीची बैठक
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी उद्या (गुरुवार) सकाळी ९ वाजता होणारी महत्त्वाची बैठक प्रशासनाने अचानक पुढे ढकलत आज (बुधवार) रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे. मात्र, आज रात्रीच्या बैठकीत ऊसदराबाबत ठोस आणि समाधानकारक निर्णय न झाल्यास, उद्या सकाळी ११ वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर बेमुदत ‘रेल रोको’ आणि जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आज रात्री होणारी ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आज रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीकडे लागले आहे.दरम्यान, आजच्या बैठकीत कारखानदार आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास उद्या सकाळपासून शेतकरी आक्रमक होऊन राज्य व राष्ट्रीय महामार्गांसह रेल्वे वाहतूक रोखून धरण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. त्यामुळे आज रात्रीच्या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.




