शिवसेनेचे माळशिरस तालुक्यातील संगम येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन; गुलाबपुष्प देऊन ऊसतोड थांबवली

प्रतिटन ५,००० रुपये दर जाहीर होईपर्यंत ऊसतोड न करण्याचे गणेश इंगळे यांचे आवाहन
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असला तरी साखर कारखान्यांकडून अद्याप एफआरपी (FRP) आणि ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही. ऊसदर जाहीर होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी ऊसतोड सुरू झाल्याचा आरोप करत, शिवसेनेच्या वतीने माळशिरस तालुक्यातील संगम येथे ‘गांधीगिरी’ मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५,००० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेने हे आंदोलन छेडले आहे.युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. संगम परिसरातील ज्या शेतांमध्ये ऊसतोड सुरू होती, तेथे प्रत्यक्ष जाऊन आंदोलनकर्त्यांनी शेतमालक आणि ऊसतोड कामगारांना गुलाबपुष्प दिले. जोपर्यंत रास्त ऊसदर जाहीर होत नाही, तोपर्यंत ऊसतोड करू नये, असे नम्र आवाहन करत त्यांनी अत्यंत शांततापूर्ण मार्गाने ऊसतोड थांबवली.
आंदोलनादरम्यान बोलताना गणेश इंगळे म्हणाले की, “सध्या खते, औषधे, कीटकनाशके, पाणी, वीज, मशागत, वाहतूक आणि मजुरीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच प्रतिकूल हवामान आणि रोगांमुळे एकरी ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असून दुसरीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. एवढा खर्च करूनही शेतकऱ्याच्या पदरी मात्र तुटपुंजा दर पडत आहे.
बाजारात साखरेचे दर आणि मागणी वाढत असताना त्याचा लाभ शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. साखर कारखान्यांना केवळ साखरेतूनच नव्हे, तर मळी, बगॅस, प्रेसमड, सहवीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मितीतूनही कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असल्याने या सर्व उपपदार्थांच्या नफ्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
प्रतिटन ५,००० रुपये दर: उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि शेतीतील जोखीम विचारात घेऊन ऊसाला प्रतिटन ५,००० रुपये दर जाहीर करावा.
योग्य दर जाहीर होईपर्यंत साखर कारखान्यांनी आणि शेतकऱ्यांनी ऊसतोड करू नये. साखर कारखाने आणि शासनाने ऊसदराच्या प्रश्नावर तातडीने बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी.
या गांधीगिरी आंदोलनात परिसरातील शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये संगम गावचे माजी सरपंच रमेश इंगळे, ग्रामपंचायत सदस्य नरा इंगळे, आकाश पराडे पाटील, नवनाथ इंगळे, सचिन इंगळे, अक्षय भोई, विकास भोई, अमित भोई, अविनाश भोई, आदित्य इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.




