मळोलीचे सुपुत्र,शिक्षक तथा पत्रकार प्रशांत विठ्ठल जाधव यांचे अपघाती निधन

भूमीपुत्र न्यूज / मळोली
माळशिरस तालुक्यातील मळोली येथील रहिवासी आणि तांदुळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षक तथा दैनिक ‘पुण्यनगरी’चे बातमीदार प्रशांत विठ्ठल जाधव (वय ४६) यांचे रस्ते अपघातात शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर २०२६) रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने मळोलीसह परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रशांत जाधव हे वेळापूर येथील काम आटोपून आपल्या मळोली गावाकडे मोटर सायकलवरून निघाले होते. दरम्यान, वेळापूर नजीक असलेल्या ‘नंदनवन पाटी’ या परिसरात त्यांची मोटर सायकल झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्याला तीव्र मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.अपघातानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. या घटनेची माहिती समजताच पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक वर्ग आणि पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती.
प्रशांत जाधव यांनी जि.प. प्राथमिक शाळा, कदमवाडी नंबर दोन येथे शिक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली होती. अध्यापनासोबतच त्यांनी काही काळ दैनिक ‘पुण्यनगरी’ वृत्तपत्रात मळोली गावचे प्रतिनिधी म्हणूनही यशस्वीपणे काम केले होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कर्ता पुरुष अचानक अपघातात गेल्यामुळे जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
भूमीपुत्र न्यूज परिवार तर्फे दिवंगत प्रशांत विठ्ठल जाधव सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वराने त्यांच्या कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो.ॐ शान्ति! शान्ति!




