महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील बिनविरोध

भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी जाहीर झाली असून या परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 33 जिल्हा संघटनांनी सहभाग घेतला होता या निवडणुकीत कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आ रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी काम पाहिले स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी मुहूर्तमेढ रवलेल्या या परिषदेचे दीर्घकालीन नेतृत्व शरद पवार यांनी केले असून शरद पवारांच्या कार्यकाळात कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
कुस्तीला वेळोवेळी चालना देणे , मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून वारंवार होत असून स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरीला चांदीची गदा देउन सन्मान करण्यात येतो. डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक हाती वर्चस्व असतानाही महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद संभाळणारे व सध्या कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नसणाऱ्या डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड हे त्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी आजपर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती आहे असेही बोलले जात आहे त्यांच्या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील व विशेषता माळशिरस तालुक्यातील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला




