मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक,दोघांचा मृत्यू,दोन गंभीर जखमी;पिलीव येथील घटना
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील म्हसवड रोड वर बागवान टेकाजवळ 26 फेब्रुवारी रोजी राञी 8.30 च्या सुमारास दोन मोटर सायकलची धडक होऊन यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

पिलीव वरून राजवर्धन बापु शिरतोडे वय 18 हे आपल्या सप्लेंडर गाडीवरून (एम.एच 11 सि ई 5828) हे आपल्या खडकी ता.माण जि सातारा गावाकडे जात असताना पिलीव नजीक बागवान टेकाजवळ सुळेवाडी गावाकडुन एच.एफ. डिलक्स ( एम.एच.45 ए जी 6790) या गाडीवरून स्वप्नील ( समाधान) शिंगु सुळे ,साईराज सत्यवान सुळे व गणेश रामचंद्र माने तिघांचे ही वय 18 वर्ष हे स्वप्नीलचा 27 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्यामुळे कपडे घेण्यासाठी पिलीवकडे येत असताना चार चाकी गाडीला ओव्हरटेक करुन पुढे येण्याच्या नादात या दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरावर धडक झाली.यामध्ये राजवर्धन शिरतोडे याचेहात आणि पायाला चार ठिकाणी फ्रॅक्चर तसेच जिभ तुटुन बाहेर आली तर स्वप्नील सुळेला जोरदार मार बसुन तो बेशुद्ध झाला .
राजवर्धन शिरतोडे यास अकलूज येथे दवाखान्यात नेत असतानाच वेळापूर जवळ त्याचा मृत्यू झाला तर स्वप्नील सुळे यास अकलूज येथील डाॅकटर इनामदार यांच्या आश्विनी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु असताना राञी 1.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.यामध्ये साईराज सुळे याचा पाय मोडला आहे तर गणेश माने हाही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे त्या दोघांवर ही अकलूज येथील डॉ इनामदार यांच्या हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु आहेत.स्वप्नील सुळे ,साईराज सुळे व गणेश माने हे तिघेजण सुळेवाडी गावातील असून म्हसवड येथे बारावीत शिकत आहेत .
सध्या बारावीची परीक्षा अंतीम टप्प्यात आहे .पुढे ते एम.एच.सिईटीची परीक्षा देऊन पुढे शिक्षण घेण्यासाठी तयारी करीत असताना आपला मित्र मयत स्वप्नील याचा 27 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला . वाढदिवस साजरा करण्याऐवजी अंत्यसंस्कार करण्याची वाईट वेळ स्वप्नील च्या कुटुंबावर व मित्र परिवारावर आली. मयत स्वप्नील सुळे याचे अकलूज येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



