‘आदर्श आचारसंहितेचे पालन करा’; तहसीलदार सुरेश शेजुळ यांचे निवडणूक कर्मचाऱ्यांना आवाहनअकलूज येथे 2306 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण,माळशिरस निवडणूक यंत्रणा सज्ज

भूमीपुत्र न्यूज
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अकलूजच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पहिल्या टप्प्यातील २३०६ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे मतदानाचे धडे देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी “संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काटेकोर दक्षता सर्वांनी घ्यावी,” असे आवाहन केले.अकलूजमधील स्मृतीभवन, यशवंतनगर येथे शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ व नायब तहसीलदार अमोल कदम यांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, दृकश्राव्य पद्धतीने चलचित्रफितीद्वारे दोन सत्रांत ही माहिती देण्यात आली.मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती कार्यवाही करावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महर्षी प्रशाला, यशवंतनगर येथे ५० झोनल ऑफिसर व ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आले. प्रशिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांचे छोटे गट करून २५ स्वतंत्र क्लास रूममध्ये हा सराव करून घेण्यात आला.
या सत्राला निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, गटशिक्षणाधिकारी स्वरा महामुनी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण सुळ, महसूल तहसीलदार सिद्धनाथ जावीर, पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे, सहाय्यक महसूल अधिकारी अजित जाधव, चंद्रकांत भोसले यांसह सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थींसाठी चहा आणि नाश्त्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती.




