सबळ पुराव्याअभावी पत्नीच्या खून प्रकरणातून पतीची सुटका, माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

भूमीपुत्र न्यूज
पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गंभीर आरोपातून नितेश सुखदेव आडगळे (रा. मांडवे, ता. माळशिरस) याची सबळ पुराव्याअभावी माळशिरसच्या मा.जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश ताम्हणकर यांनी हा निकाल दिला.
मांडवे येथील नितेश आडगळे याचे लग्न मार्डी लोहारा (ता. उत्तर सोलापूर) येथील सोमनाथ मिसाळ यांची मुलगी पूनम हिच्याशी झाले होते त्यांना तीन मुले आहेत.नितेश हा पूनमला मारहाण करत असून पैशाची मागणी करत असे, याच वादातून त्याने पूनमचा गळा दाबून खून केला अशी फिर्याद सरकार पक्षाकडून मांडण्यात आली होती. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲड.भिलारे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.सरकार पक्षाला आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. परिणामी संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने नितेश आडगळे याची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
आरोपीच्या वतीने ॲड.बाळासाहेब भिलारे,ॲड.विक्रम भिलारे,ॲड.अमोल वाळेकर आणि ॲड.राहुल जगदाळे यांनी काम पाहिले.




