कोळेगांव येथील दुपडे कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम रक्षा विसर्जित न करता झाडे लावा, झाडे जगवा दिला संदेश

भूमीपुत्र न्यूज
कोळेगांव ता माळशिरस येथे कलावती बाबासो दुपडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते .मृत्यू समयी त्यांचे वय 97 वर्षे इतके होते.रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरण वाचवण्यासाठी कोळेगांव येथील दुपडे दाम्पत्याने नदीपात्रात रक्षा विसर्जित न करता पर्यावरणाचा समतोल राहावा या हेतूने झाडे लावून त्या ठिकाणी त्यांची रक्षा विसर्जित करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
कलावती बाबासो दुपडे यांच्या निधनानंतर दुपडे दाम्पत्यांनी सामाजिक भान ठेवत काळानुरूप आपणही बदलले पाहिजे या हेतूने रक्षाविसर्जनाच्या दिवशी त्यांची रक्षा इतरत्र कोठेही विसर्जित न करता आपल्या शेतात पाच आंब्याची झाडे लावून त्या झाडाखाली त्यांची रक्षा विसर्जित करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचा हा अभिनव उपक्रम सर्वत्र चर्चिला जात असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी इतरांनीही त्याचे अनुकरण करावे व पर्यावरणाचा समतोल राखावा असे बोलले जात आहे.
यावेळी भास्कर दुपडे, किशोर दुपडे,दादासो कदम,सचिन दुपडे, युवराज सुरवसे,दत्तात्रय दुपडे डॉ अक्षय कदम,शहाजी दुपडे, आदी बांधव उपस्थित होते.
कलावती बाबासो दुपडे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली ,सुना, नातवंडे असा परिवार असून त्या डॉ. संजय शंकर दुपडे यांच्या आजी होत्या .




