माळशिरसच्या तहसीलदारांची कार्यतत्परता;रविवारी सायंकाळी दिला विद्यार्थ्यांला शेतकरी असलेचा दाखला
पुढील शिक्षणासाठी अर्ज करण्याची होती आज अंतिम मुदत
भूमीपुत्र न्यूज
सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी प्रचिती बहुधा सर्वांनाच येत असते,परंतु सध्या सर्वत्र ऑनलाइन सरकारी कामे होत असल्याचे पहायला मिळते.शनिवार,रविवारी शासकीय सुट्टी असते,ऑनलाइन सर्व्हर डाऊन झाल्याने ही कित्येक वेळा कामाचा खोळंबा होत असतो, परंतु काम करण्याची इच्छा असल्यास त्याला कारण लागत नाही असाच प्रत्यय माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील एका विद्यार्थ्यांला आला आहे.
निलेश सुनील दुपडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून या विद्यार्थ्याला बी .व्ही . सी व्हेटर्नरी या कोर्ससाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेतकरी असल्याचा तहसीलदार यांचा दाखला हवा होता. आणि त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याची आज रविवार दि.७ जुलै २०२४ ही अंतिम मुदत होती.
काही अडचणीमुळे हा दाखला घेण्यासाठी निलेश दुपडे यास वेळ लागला, कोळेगांव येथील महा ई सेवा केंद्रातून दाखला मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज ही केला परंतु शनिवार,रविवार शासकीय सुट्टी असल्याने हा दाखला मिळायला अडचण झाली असता कोळेगांव च्या सरपंच सौ रजनी दुपडे यांनी रविवारी माळशिरस चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांना संपर्क करून शेतकरी असलेचा दाखला या विद्यार्थ्याला न मिळाल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे सांगितले असता माळशिरस चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी विद्यार्थ्याचे नुकसान टाळण्यासाठी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने गावी गेले असता तात्काळ माळशिरस तहसील कार्यालय येथे येऊन रात्री ८ वाजता निलेश दुपडे यास शेतकरी असल्याचा दाखला दिला व यामुळे निलेश चे होणारे शैक्षणिक नुकसान टळले.
निलेश व त्याचे आई वडील यांनी तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यावर कृतज्ञता व्यक्त करीत तहसीलदार साहेबांच्या रूपाने आम्हाला विठ्ठलच पावला असे उदगार काढले.