राष्ट्रीयीकृत बँकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे / सहकार आयुक्त
भूमीपुत्र न्यूज
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये.रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत.राष्ट्रीयीकृत बँकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे,असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बॅकर्स कमिटीला पाठवले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की,शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या दारात जायला लागू नये यासाठी पीक कर्जासाठी बँकांनी सिबिल अथवा सिबिल स्कोअरचे बंधन घालू नये.राज्यातील बॅका शेतकर्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज मंजूर अथवा वितरीत करताना सिबिल अहवाल अथवा सिबिल स्कोअर विचारात घेतात.सिबिल स्कोअर 600 ते 700 असल्याशिवाय पीक कर्ज वितरीत करीत नाहीत.बॅकाच्या या भूमिकेमुळे राज्यातील शेतकर्यांना कर्ज मिळण्यास अडचण येत आहे.विविध पिकांच्या उत्पादनासाठी तथा जोपासणीसाठी शेतकर्यांना भांडवलाची तथा कर्जाची गरज असते यातूनच शेतकरी शेती उत्पादन करीत असून यामधून त्यांना रोजगार तसेच चरितार्थाचे साधन उपलब्ध होते त्यामुळे शेतकर्यांना भांडवल उपलब्धतेसाठी बँकांवर अवलंबून रहावे लागते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मार्फत पीक कर्ज पुरवठा करताना सिबिल अथवा सिबिल स्कोअर विचारात न घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर व वितरीत केले जाते.रिझर्व्ह बँकेकडील प्राधान्यक्रम क्षेत्रास कर्जपुरवठा करण्याच्या सूचना बँकांनी एकूण कर्जपुरवठ्याच्या विहित केलेल्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणे बंधनकारक आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशामध्ये सिबिल अहवाल तथा सिबिल स्कोअर घेण्याचे निर्देश नसल्याने या बाबी विचारात घेऊन संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्या कर्ज धोरणामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.कर्ज मंजूर वितरीत करताना सिबिल अथवा सिबिल स्कोअर याबाबतचे बंधन न घालण्याबात सूचित करावे.