माळशिरस तालुकाराजकीय

कोळेगांव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन गटांत सरळ लढत; सरपंच पदासाठी सुषमा दुपडे विरुद्ध सुनीता सावंत

भूमीपुत्र न्यूज

कोळेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह रिक्त असलेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आज शुक्रवारी, १७ एप्रिल २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये अश्विनी प्रवीण सावंत यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने, आता सरपंच पदासाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुषमा धनंजय दुपडे आणि सुनीता अरुण सावंत यांच्यात थेट आणि सरळ लढत होत आहे.​

निवडणुकीची पार्श्वभूमी

कोळेगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०२२ मध्ये पार पडली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनल आणि विरोधी जय बिरोबा ग्रामविकास पॅनलची युती होऊन रजनी प्रसाद दुपडे सरपंचपदी निवडून आल्या होत्या. मात्र, स्थानिक पातळीवरील तडजोडीनुसार अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सरपंच रजनी दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रशासकीय कारणामुळे निवडणूक काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. आता होणाऱ्या या पोटनिवडणुकीतून निवडून येणाऱ्या सरपंचाला व सदस्यांना पुढील १८ महिन्यांचा कालावधी काम करण्यासाठी मिळणार आहे.​

सदस्य पदासाठीही चुरस

सरपंच पदासोबतच वार्ड क्रमांक २ च्या रिक्त जागेसाठीही पोटनिवडणूक होत आहे. सदस्य किशोर सुखदेव सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी किशोर सावंत यांचे चिरंजीव ओम सावंत आणि सिद्धेश्वर मनोहर दुपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, येथेही सरळ लढत होत आहे.​

प्रचारासाठी नऊ दिवसांचा अवधीनिवडणूक जाहीर झाल्यापासून आता प्रचारासाठी उमेदवारांना नऊ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून, २८ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर २९ एप्रिल २०२६ रोजी मतमोजणी होऊन कोळेगावच्या सरपंचपदी कोण विराजमान होणार आणि सदस्य पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण गावासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!