मराठी भाषा जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज/ डाॅ. बाळासाहेब मुळीक
भूमीपुत्र न्यूज /संजय लोहकरे
21 व्या शतकामध्ये सर्वजण इंग्रजीच्या पाठीमागे धावत आहेत.सर्वांना वाटते आपली मुले इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत हा अट्टाहास आहे.परंतु रोजच्या दैनंदिन व्यवहारात अथवा जीवन जगत असताना आपली मातृभाषा आपणाला उपयोगी पडते. जर आपण मातृभाषेवर प्रभुत्व मिळवले तर आपण नंतर इतर कोणतीही भाषा अवगत करू शकतो.त्यासाठी आजच्या तरुणांनी मराठी भाषेचे जतन करणे आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे मत डॉ.बाळासाहेब मुळीक यांनी व्यक्त केले ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कथाकथनाचा कार्यक्रम समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण कथाकार तानाजी बावळे (वेळापूर) यांनी त्यांच्या ग्रामीण कथाकथनाने सुरुवात केली.तानाजी बावळे यांनी कुटुंब नियोजन,आई राजा उदो उदो या ग्रामीण विनोदी कथाकथन करून ग्रामीण मराठी भाषेची माहिती ग्रामीण ढंगात सांगून कालबाह्य होणारे मराठीतील शब्दाचे अर्थ सांगत त्यांनी कथा सादर केल्या. कार्यक्रम प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.यावेळी अभ्यासकेंद्रातील सर्व समन्वयक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनायक माने यांनी केले तर सूत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक प्रा.संग्रामसिंह शिंगाडे यांनी केले तर प्रा.गणेश धायगुडे यांनी आभार मानले.