नियतीने घडवलेले नितांत सुंदर शिल्प,’सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील’ / प्राचार्य शिवाजीराव भोसले

भूमीपुत्र न्यूज / ॲड संजय गोरख मगर,पुणे
माळावरच्या नंदनवनाचे स्वप्न पाहणारे,खेडूतांच्या कल्याणाचा सदैव ध्यास घेणारे, सहकाराची जाण असणारे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील. क्रांतिसिंह नाना पाटलांचे मराठमोळे वक्तृत्व,वसंत दादांची सहकाराची जाण,यशवंतराव चव्हाण साहेबांचे चातुर्य ,भाऊसाहेब हिरे यांची बहुजन निष्ठा ,अशा अनेक रंगाने शोभून दिसणारे ,स्व.शंकररावांचे व्यक्तिमत्व हे नियतीने घडवलेले एक ‘नितांत सुंदर शिल्पच’ मानावे लागेल.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर च्या काळात काही वर्ष,अनेक कर्तृत्ववान सेवाभावी मंडळी राज्याच्या मंत्रिमंडळात होती. त्यांनी राज्याच्या विकासाच्या अनेक योजना धडाडीने राबवल्या ,पण शंकरराव मोहिते पाटील हे विचाराने व कर्तुत्वाने मंत्रिमंडळाच्याही दहापट पुढे होते. त्यामुळे ते यशस्वी होत गेले, मी तर म्हणेन ,’त्यांचे मोठेपण व कर्तृत्व कुणाच्याही मदतीवर व कृपादृष्टीवर अवलंबून नव्हते, शंकरराव हे शेतकरी कामगार पक्षाचे होते, काँग्रेसचे होते, पण त्यापेक्षाही ते आपल्या भागातील लोकांचे सर्वार्थाने अधिक होते.
आपल्या,आई वडिलांच्या विषयी अपार भक्ती भाव, शिवपार्वतीच्या चरणी अढळनिष्ठा हा साक्षी भाव त्यांनी कायम जपला. ‘आहे तितुके देवाचे’ या भावनेचे शंकरराव हे ‘ ‘पुरुषोत्तम’ होते. त्यांचे सर्व राजकारण व समाजकारण शेतकरी स्वावलंबी असावा, स्वाभिमानी असावा या विषयाभोवती फिरत असे. त्यांनी आपल्या प्रभावाने अत्यंत कष्टाळू व निष्ठावान माणसे निर्माण केली. कसल्याही व्यक्तिगत्व स्वार्थाचा विचार न करता समाजाच्या भल्यासाठी त्यांनी सहकार चळवळ चालवली. त्याकाळी वाहनांची फारशी व्यवस्था नव्हती लोकांकडे पैसा नसायचा,खायला पोटभर मिळेल याचीच अखंड चिंता…..या काळात शंकररावानी हे प्रचंड कार्य उभे केले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एक रांगडं कर्तृत्व अन् नेतृत्व महाराष्ट्राने शंकररावांच्या रूपाने एकेकाळी पाहिले.
असा निस्पृही,स्वाभिमानी, कर्तृत्ववान व ‘लोककल्याणकारी’ नेता बहुजन समाजाला पुन्हा मिळेल काय …?
महाराष्ट्राच्या एका ‘ शिल्पकारास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ‘ …..!



