भावाने केला बहिणीच्या लग्नाचा 39 वा वाढदिवस थाटात… निमगावच्या मगर कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम

भूमीपुत्र न्यूज
तारीख 2 जून 1986 निमगावच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी नाव लक्ष्मी…लक्ष्मीच्या पावलांनी खंडाळीच्या रिसवडकर कुटुंबीयांची सून झाली ..मुलीच्या वडिलांनी हलाकीच्या परिस्थितीतही आपल्या कुवतीप्रमाणे दारात मंडप टाकून लक्ष्मीचे लग्न लावून दिले.वऱ्हाडी मंडळींची जेवणाची सोय केली .जेवणात लापशी बनविली व लग्न पार पडले. खंडाळीच्या रिसवडकर कुटुंबीयांनी ही आनंदाने सर्व सोहळा पार पाडला.

हा सर्व सोहळा पार पडत असताना आपल्या वडिलांची होणारी ससेहोलपट सात ते आठ वर्षाच्या विलासने पाहिली होती. आणि मनाशी खूनगाटही बांधली होती की भविष्यात आपण निश्चितच याची भरपाई करू. कालांतराने लक्ष्मीचा संसार आपले पती दत्तात्रय रिसवडकर यांच्याबरोबर सुखा समाधानाने सुरू झाला. इकडे विलास व त्याचा लहान बंधू सतीश या दोघांचाही संसार सुखा समाधानाने सुरू होता परंतु विलासच्या मनात नेहमी एक गोष्ट खटकत होती की आपण आपल्या बहिणीसाठी काहीतरी करायला हवं आणि विलास व सतीश या दोन्ही बंधूंनी तब्बल 39 वर्षांनी आपल्या बहिणीच्या लग्नाचा 39 वा वाढदिवस निमगाव येथील आपल्या निवासस्थानी परिसरातील लोकांना स्नेहभोजन देऊन मोठ्या थाटा माटात साजरा केला .

हा घटनाक्रम आहे निमगाव-मळोली रोडवरील विलास गणपत मगर व सतीश गणपत मगर या दोन्ही बंधूंनी आपल्या सावत्र बहिणीच्या लग्नाचा 39 वा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे यावेळी या कार्यक्रमासाठी निमगाव चे माजी सरपंच व ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी हनुमंत पवार ,निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन वसंतराव पाटील, मराठा सेवा संघाचे निनाद पाटील,आनंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात विलास व सतीश या दोन्ही बंधूंनी नात्यातील ओलावा जपत आपल्या सावत्र बहिणीचा साजरा केलेला 39 वा लग्नाचा वाढदिवस समाजामध्ये एक वेगळाच संदेश देऊन गेला साजरा केलेला वाढदिवस जरी छोटा असला तरीही नात्यातील दुरावत असलेले स्नेहबंध कसे जोडावेत याबाबतीत फार मोठा संदेश समाजाला हा कार्यक्रम देऊन गेला आहे.




