माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

इतरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही – शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद मोरे यांचे प्रतिपादन

भूमीपुत्र न्यूज

नातेपुते ता माळशिरस येथे शिवप्रसाद दूध संघ, दहिगाव यांच्या वतीने शिवप्रसादच्या सेंटर चालकांसाठी विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरदबापू मोरे, मॅनेजिंग डायरेक्टर रमेशमोरे यांनी सेंटर चालकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.बैठकीत दूध व्यवसायातील गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांचा विश्वास याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना शरद बापू मोरे म्हणाले कि, दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ करणे हा गंभीर गुन्हा असून इतरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.

दूध हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचे अन्नपदार्थ असल्याने त्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे ही प्रत्येक उत्पादक व संकलकाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच शुद्ध व दर्जेदार दूध उत्पादन करण्यासाठी पशुपालकांनी योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. दूध संकलन केंद्रांवर गुणवत्तेची तपासणी कशी करावी, दूधातील भेसळीचे प्रकार कोणते आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि भेसळ आढळल्यास संबंधितांवर कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी ग्राहकांचा विश्वास जपणे हेच दूध व्यवसायाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र असल्याचे सांगत, शुद्ध दूध पुरवठ्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा वाढते आणि व्यवसाय अधिक सक्षम होतो, असे मतही व्यक्त करण्यात आले. सेंटर चालकांनी दूध संकलन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या.कार्यक्रमास शिवप्रसाद दूध संघाशी संलग्न असलेल्या अनेक सेंटर चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

बैठकीनंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.”दुधात भेसळ करू नका, शुद्ध दूध द्या, ग्राहकांचा विश्वास जिंका आणि आपला व्यवसाय अधिक सक्षम करा,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!