जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापतीपदी संस्कृती सातपुते यांची निवड, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले अभिनंदन
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत संस्कृती सातपुते यांची ‘समाजकल्याण समिती’ सभापती पदी निवड झाली असून ही निवड माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

या निवडीने माळशिरस भाजपात नवचैतन्य निर्माण झाले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती सातपुते यांचे अभिनंदन केले आहे.संस्कृती सातपुते या माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी असून, त्यांच्याकडे असलेले उत्तम वक्तृत्व आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात खा धैर्यशील मोहिते पाटील आणि आ उत्तम जानकर यांच्या गटांविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केले आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या संघर्षाची आणि पक्षनिष्ठेची दखल या अगोदर भाजपाने घेतलीच आहे परंतु आपली वेगळी ओळख निर्माण करीत दहिगाव जिल्हा परिषद गटातून माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव करणाऱ्या संस्कृती सातपुते यांना भाजपाने सभापती पदाची संधी देऊन माळशिरस भाजपाला ताकद दिल्याचे बोलले जात आहे.
या निवडीमुळे माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, विशेषतः मोहिते-पाटील गटाच्या विरोधात काम करणाऱ्या गटाला यामुळे मोठे बळ मिळाले आहे. ही निवड म्हणजे माळशिरस तालुक्यातील आगामी ग्रामपंचायतच्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून भाजपची माळशिरस तालुक्यातील तटबंदी मजबूत करण्याचा एक प्रयत्न म्हणावा लागेल.
पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपामय केला असून भाजपाचा जिल्ह्यात सुपडा साफ हे विधान बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरले आहे. सभापती पदी निवड झाल्या नंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत




