नातेपुते येथे ‘शिवप्रसाद उद्योग समूहा’चा गौरवशाली विस्तार; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या उपक्रमांचे लोकार्पण

भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे अक्षय्य तृतीयेच्या मंगलमयी मुहूर्तावर ‘शिवप्रसाद उद्योग समूहा’च्या प्रगतीमध्ये आणखी एक सुवर्णपान जोडले गेले. समूहाच्या वतीने ‘शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट्स’ आणि ‘SPG मल्टिस्टेट’ या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांचे भव्य उद्घाटन पार पडले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. ‘शिवप्रसाद उद्योग समूहा’चे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हा समूह ग्रामीण भागात सातत्याने विकासाची नवीन शिखरे सर करत आहे.


‘ना नफा, ना तोटा’ (No Profit, No Loss) या तत्त्वावर मेडिकल सेवा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना वाजवी दरात औषधोपचार उपलब्ध होणार आहेत.शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्यासाठी ‘SPG मल्टिस्टेट’ची स्थापना करण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


या ऐतिहासिक सोहळ्यास परिसरातील अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संस्कृतीताई सातपुते, मा.आमदार रामहरी रुपनवर, बाबाराजे देशमुख, सुजयभैया माने-पाटील, प्रकाश पाटील,आप्पासाहेब देशमुख यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार बांधव, ग्रामस्थ आणि मोरे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने शिवप्रसाद उद्योग समूहाचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





