महाराष्ट्रमाळशिरस तालुका

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या करणाऱ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

भूमीपुत्र न्यूज

पोलिसांना खबऱ्या म्हणून माहिती देत असल्याच्या संशयावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीची तलवार आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना माळशिरस सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.१ मे २०२१ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास माळशिरस गावातील अमीर हॉटेल ते मुख्य बाजारपेठ जाणाऱ्या रस्त्यावर, ट्रेझरी ऑफिससमोर ही घटना घडली होती.

मयत पवन निलक्या काळे (वय ४२, रा. माळशिरस) याच्यावर आरोपींनी “तू आमच्या बातम्या पोलिसांना देतो, त्यामुळे आम्हाला त्रास होतो” असे म्हणून तलवार आणि दगडाने हल्ला केला होता. या हल्ल्यात पवन काळे यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नागेश शहाजी काळे आणि सनी शहाजी काळे (दोघे रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत इतर दोन अनोळखी मुलेही या गुन्ह्यात सामील होती.

माळशिरस जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. डी. हुलीसो यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयताची पत्नी आणि फिर्यादी फुलाबाई काळे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तानाजी राजाराम राजगे, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.न्यायालयाने दोन्ही आरोपींना भा.दं.वि. कलम ३०२ (हत्या) आणि कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अन्वये दोषी धरून आजन्म कारावास आणि प्रत्येकी १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपींचा यापूर्वीचा न्यायालयीन कोठडीतील कालावधी शिक्षेत ग्राह्य धरला जाणार आहे.या गुन्ह्यात तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन पैरवी म्हणून सहाय्यक उपपोलीस निरीक्षक विलास गणपत पाडुळे व पो.ना. ७४६ माने यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. टी. मेंढेगिरी यांनी काम पाहिले, त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. एस. पाटील यांनी सहाय्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!