महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

सराईत गुन्हेगार अवधूत शेंडगेवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात रवानगी

भूमीपुत्र न्यूज

वेळापूर (ता. माळशिरस) व परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे (रा. पिसेवाडी) याच्या विरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेंडगे याला एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार त्याची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

अवधूत शेंडगे हा गेल्या काही दिवसांपासून वेळापूर आणि अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय होता.त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अवैध सावकारी, घातक हत्यारांनी दुखापत करणे आणि विनापरवाना शस्त्रे बाळगणे असे एकूण ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती,मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट, परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम त्याने सुरूच ठेवले होते.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेंडगे याच्या गुन्हेगारी आलेखाची दखल घेऊन वेळापूर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.

जिल्ह्यातील वाळूतस्कर,अवैध सावकारी करणारे आणि शरीराविषयक गुन्हे करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. अशा सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाईल.

अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पो.उप.नि. शेळके,अनिस शेख, मोहन मनसावाले,तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कर्ष देवकुळे व विलास म्हेत्रे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!