मराठा समाजासह ,समाजातील सर्वपक्षीय नेत्यांची शनिवारी अकलूज येथे महत्त्वपूर्ण बैठक

भूमीपुत्र न्यूज
मराठा आरक्षण,कुणबी दाखले व इतर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार असून त्याच्या नियोजनासाठी शनिवार दि.२३ मे रोजी सर्व पक्षीय मराठा बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी येथे अखंड मराठा समाज माळशिरस तालुक्यातील कोअर कमिटीची बैठक झाली.त्यामध्ये समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केले,त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे.त्यानंतर दोन वेळा राज्यातील संपूर्ण मराठा समाज घेऊन मुंबईला गेले.मात्र आश्वासना पलीकडे हाती काही लागले नाही,अनेकदा मुदती देऊनही शासनाने केवळ फसवणूकच केल्याची मराठा समाजाची भावना झाली असल्याने शेवटी आर नाही तर पार ही भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी दि ३० मे रोजी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला असून राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून हजारो मराठा बांधव जाणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी दि.२३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कृष्ण लीला बॅकवेट हॉल डॉ.धनेश गांधी हॉस्पिटल शेजारी मराठा समाजासह समाजातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,
त्यामध्ये सर्व सत्ताधारी,विरोधी पक्षाचे नेते मंडळी ही उपस्थित राहणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सन 2016 च्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षातील मराठा नेत्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाची वज्रमूठ दाखवून दिली होती याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील मराठा समाजातील राजकीय मंडळी आपले राजकीय जोडे बाजूला सारून शनिवार दिनांक 23 मे रोजी अकलूज येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या 30 मे रोजी होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन पुन्हा एकदा मराठा समाजाची वज्रमूठ दाखवून देणार आहेत




