माळशिरस तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न जलदगतीने निकाली काढण्यासाठी महसूल रस्ता अदालतचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म दिनांक 17/09/2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02/10/2025 या कालावधीत शिव, पाणंद रस्ते विषयक मोहिम राबविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत जाणारा रस्ता हा अत्यंत महत्याचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्ता अडविणे अथवा रस्ता उपलब्ध नसणे या अडचणीमुळे शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे दाद मागावी लागते. तहसिलदार यांचा निकाल झाल्यानंतरही त्यावर होणारी अपिले व त्याचा निकाल होईपर्यंत बराच कालावधी जातो. त्यामुळे रस्ता उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन रस्त्यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याबाबत मा. महसूलमंत्री यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न जलदगतीने निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर रस्त्याच्या अपिल प्रकरणांसाठी महसूल रस्ता अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 15/09/2025 रोजी सकाळी 11 ते 05 या कालावधीत उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज यांचे कार्यालयात अपिल प्रकरणी आपसी समझोता / तडजोडीने निकाली काढणेकामी एकूण 13 प्रकरणात सुनावणी नेमण्यात आली आहे. यातील प्रत्येक प्रकरणात रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने उभयपक्षी समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सदर प्रकरणांची यादी उपविभागीय अधिकारी कार्यालय, माळशिरस विभाग अकलूज व तहसिल कार्यालय माळशिरस येथील नोटीस बोर्डवर उपलब्ध असून पक्षकारांना वैयक्तिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरी सदर महसूल रस्ता अदालत ला मोठ्या संख्येने हजर राहून प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अकलूज उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.




