शंकरराव मोहिते महाविद्यालयात शोभिवंत वनस्पती व बोन्साय निर्मिती कार्यशाळा संपन्न
भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यप्रसिद्धी सप्ताहा अंतर्गत ,’शोभिवंत वनस्पती व बोन्साय निर्मिती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. वनस्पती शास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख प्रा. रामलिंग सावळजकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. जनार्दन परकाळे हे होते.
यावेळी बोलताना प्रा. सावळजकर म्हणाले की, बोन्साय निर्मिती तंत्राला आर्थिक दृष्ट्या मोठे महत्त्व येणार आहे याचबरोबर शोभिवंत वनस्पतींची लागवड हे एक तंत्र आहे. शास्त्रशुद्ध पणे केलेल्या लागवडीमुळे आपल्या राहत्या घराचा परिसर सुशोभित होऊन गृहशोभा वाढीस लागते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपले स्वास्थ्य हरवून बसला आहे, त्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठीही या शोभिवंत वनस्पती खूप मदत करतात., त्याचप्रमाणे घर आणि घरासमोर सभोवताली लावल्या गेलेल्या या वनस्पतींमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा स्तर उंचावतो तसेच रोगजंतूंचा नाश करण्यासाठी व परिसर निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा या वनस्पती अत्यंत उपयोगी आहेत .त्यासाठी त्यांची लागवड महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वतःच्या घराच्या परिसरात करावी असे आवाहन त्यांनी केले .
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. परकाळे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, म्हणून विद्यार्थ्यानी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे ,यामधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना, स्वयंशिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान स्वतंत्रपणे विचार करण्याची वृत्ती ,श्रमसंस्कार आदी गुणांचा परिपोष होत असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले. अलफीया शेख या स्वयंसेवीकेने सूत्रसंचालन केले तर मनीषा तांबवे हिने आभार मानले. या कार्यशाळेसाठी 150 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. सज्जन पवार प्रा .स्मिता पाटील महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे यांनी परिश्रम घेतले.