अकलूज येथे जेष्ठ नागरिक संघाचा 18 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
भूमीपुत्र न्यूज/ केदार लोहोकरे
माळशिरस तालुका जेष्ठ नागरिक संघाचा 18 वा वर्धापनदिन व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती अकलूज येथे रूपा हाॅल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदकुमार दोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि प चे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, अरविंद फडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सुरुवातीस नेताजी सुभाषचंद्र बोस व स म शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत जेष्ठ नागरिक संघटनेच्या उपाध्यक्ष नयना शहा यांनी केले. चालू वर्षात संघटनेतील निधन झालेल्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पुणे विभागीय सचिव हणमंत कुंभार यांनी 23 जानेवारी 2005 साली स्थापन झालेल्या अकलूजच्या जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक करून गेल्या 18 वर्षात संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवून नावलौकिक मिळविला आहे. पुर्वीच्या सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या सवलती सध्या बंद केलेल्या आहेत त्या पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी केली.
यावेळी जेष्ठ नागरिक संघ अकलूज व पुणे येथील संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ” सौ साल पहले,मेरा प्यार भी तू है ” हिंदी व मराठी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला गायक मोहनकुमार गोयल,कल्पना कुलकर्णी, अजितकुमार देशपांडे व नंदकिशोर भोसले यांनी १९६० ते १९८० दशकातील बहारदार गाणी सादर केली या गाण्यांच्या तालावर सर्वांनीच ठेका धरला.जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य काशिनाथ डांगे (वय ९४) डि.पी.पवार सर (वय ७८) शांतीभाई शहा (वय ७०)यांनी बहरदार नृत्य केले यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात साद दिली.