माळशिरस मतदार संघात मंगळवार पासून ‘विशेष सखोल पुनरीक्षण(SIR )’ मोहीम; BLO करणार घरोघरी जाऊन मतदार पडताळणी

भूमीपुत्र न्यूज
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माळशिरस विधानसभा मतदार संघात मंगळवार दिनांक ३० जून २०२६ पासून ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेला सुरुवात होत आहे. ही मोहीम २९ जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, या अंतर्गत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या संदर्भात माळशिरस विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी विजया पांगारकर यांनी प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे.
या मोहिमेदरम्यान BLO प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडून गणना फॉर्म (Enumeration Form) भरून घेणार आहेत. या फॉर्ममधील सर्व माहिती अचूक भरून देणे मतदारांसाठी आवश्यक आहे, कारण या माहितीचे पुढे संगणकीकरण केले जाणार आहे. जर पहिल्या भेटीत मतदार घरी उपलब्ध नसतील, तर BLO एकूण ३ वेळा त्यांच्या घरी भेट देतील.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या मतदारांचे गणना फॉर्म भरून पूर्ण होणार नाहीत, त्यांची नावे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी या मोहिमेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे.
मोहीम कालावधी (घरोघरी भेट): ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: ५ ऑगस्ट २०२६दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: ३ ऑक्टोबर २०२६
या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवडणूक प्रशासनाने मतदार संघातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक विशेष बैठक घेतली आहे. या बैठकीत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना या मोहिमे संदर्भातील सविस्तर सूचना व नियमावली देण्यात आली असून, त्यांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“माळशिरस मतदार संघातील सर्व नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे आणि ही मोहीम यशस्वी करावी,” असे आवाहन मतदार उपविभागीय अधिकारी, अकलूज यांनी केले आहे.




