माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

महिला एसटी वाहकास मारहाण व शासकीय कामात अडथळा; बाभूळगावच्या दोघांना 2 वर्षे सक्तमजुरी

भूमीपुत्र न्यूज

सांगोला आगारामधील महिला बस वाहकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. बाभूळगाव (ता. माळशिरस) येथील गणेश कृष्णदेव पवार आणि योगेश पोपट गोडसे या दोन आरोपींना विविध कलमान्वये २ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

2 फेब्रुवारी 2018 रोजी सांगोला-अकलूज बस (चालक: तानाजी केंगार) अकलूज बसस्थानकात फलाट क्रमांक 3 वर उभी होती. बसमध्ये गर्दी असल्याने वाहक दीपाली अनिल अष्टेकर यांनी प्रवाशांना जागा नसल्याचे सांगितले. याचा राग धरून आरोपींनी महिला वाहकाशी अत्यंत अर्वाच्य भाषेत हुज्जत घालून त्यांचा विनयभंग होईल असे वक्तव्य केले. बस मार्गस्थ होत असताना पुन्हा बस थांबवून आरोपींनी अष्टेकर यांना हातावर व गळ्यावर मारहाण केली. चालक आणि इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला आणि पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.अकलूज पोलिसांनी या प्रकरणी भा.द.वि. कलम 353,332,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब भातगुडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित वाहक दीपाली अष्टेकर, सूर्यकांत सलगर, महेश पावसे आणि डॉ. सुनील नरुटे यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. डी. हुली यांनी उपलब्ध पुरावे व साक्षी ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना कलम 353 प्रमाणे 2 वर्षे सश्रम कारावास व 2000 रुपये दंड.कलम 332 नुसार 2 वर्षे सश्रम कारावास व 2000 रुपये दंड. कलम 504 प्रमाणे 6 महिने सश्रम कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे ॲड. संग्राम सुभाष पाटील व ॲड. शांतीनाथ तात्या मेंढेगिरी यांनी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून पो.हे.कॉ. रियाज मकबूल तांबोळी व पो.ना. हरिश आनंदराव भोसले यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!