निमगावात बिबट्याचा धुमाकूळ… घोड्याचे पिल्लू फरपटत नेऊन केले फस्त, वन विभागाने सावध राहण्याचा दिला इशारा

भूमीपुत्र न्यूज
रविवार दि 14 सप्टेंबर रोजी रात्रीची वेळ, पावसाची चिरचिर चालूच होती ,रात्रीच्या काळोखात बिबट्या दबक्या पावलाने अंकुश अण्णासाहेब मगर यांच्या अंगणात येतो.. दारात बांधलेले काटेवाडी जातीचे सहा महिने वयाचे जातिवंत घोड्याचे पिल्लू फरपटत उसाच्या शेतात नेऊन बिबट्याला पाहिजे तेवढे खातो आणि तिथून धूम ठोकतो.

निमगाव-मळोली रस्त्यावरील ही घटना असून शेतकरी अंकुश मगर हे सकाळी लवकर उठून पाहतात तर अंगणात घोड्याचे पिल्लू दिसून येत नाही.

सहा महिने वयाचा घोडा इकडे तिकडे सुटून गेला असेल या शंकेने ते घोडा इकडे तिकडे शोधतात परंतु त्यांना तो कुठेच आढळून येत नाही यानंतर ते आपले पुतणे विश्वनाथ उर्फ बापू मगर याला बोलतात व इतरांच्या मदतीने अंगणातील पाऊल खुणा शोधण्याचा प्रयत्न करतात या पाऊलखुना त्यांना उसाच्या शेतापर्यंत घेऊन जातात. पाऊल खुणाच्या आधारे ते उसाच्या शेतात शिरतात तर त्या ठिकाणी त्यांना मृत अवस्थेत हे घोड्याचे पिल्लू बिबट्याने अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून येते बिबट्या आसपास असेल ही शंका मनात आल्याने त्यांनी मोठ्याने आवाज काढून पाळीव कुत्र्यांच्या आधारे उसामध्ये दगडफेक केली यानंतर वनपालांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले.

तात्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येऊन सदर घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणचे पावलांचे ठसे घेऊन त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबाबत सविस्तर माहिती दिली परंतु अंकुश अण्णासाहेब मगर या शेतकऱ्याचे जातिवंत घोड्याचे पिल्लू बिबट्याने ठार केल्याने या शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी व बिबट्याचा वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी निमगाव मळोली रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
निमगाव-मळोली रस्त्यावरील अंकुश मगर या शेतकऱ्याचा घोडा हा बिबट्याने ठार केला असून सदर ठिकाणचे पावलांचे ठसे हे बिबट्याचे आहेत यामुळे या परिसरातील लोकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये लहान मुलांची व आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी वनविभागाच्या वतीने लवकरच हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत.
ए एस लोखंडे ,वनपाल पिलीव विभाग




