रोटरी ,शिवपार्वती व शिवरत्न संस्थेच्या वतीने मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली उपक्रमाचे यशस्वी आयोजन

भूमीपुत्र न्यूज
शांतता ,संघर्ष प्रतिबंध व निराकरण या विषयाच्या अनुषंगाने रोटरी क्लब अकलूज, श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अकलूज आणि शिवरत्न संस्था अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने नॉलेज सिटी, अकलूज येथील महाविद्यालयांमध्ये मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर मा.रो यशवंत हांडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी “जागतिक शांतता” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर ग्रीन फिंगर्स कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी अकलूज, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अकलूज आणि विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, शंकरनगर अकलूज येथील एकूण 48 विद्यार्थ्यांनी भारत, अमेरिका, चीन, इराण, फ्रान्स, जर्मनी, युक्रेन आणि रशिया या देशांचे प्रतिनिधित्व करत पारंपरिक पेहरावात प्रभावी सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांनी विविध देशांची भूमिका मांडत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष,मुत्सद्देगिरी, संवाद व शांततेचे महत्त्व यावर सखोल चर्चा केली.
मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली हा केवळ वादविवादाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित होतो.जागतिक घडामोडींबाबत सखोल ज्ञान व विश्लेषण क्षमता वाढते.विविध देशांच्या भूमिका समजून घेताना सहिष्णुता व जागतिक बंधुत्वाची भावना दृढ होते.कलागुण, सादरीकरण कौशल्य आणि तार्किक विचारसरणीला योग्य वाव मिळतो.रोटरी क्लब अकलूजचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्ट्या नव्हे तर जागतिक नागरिक म्हणून घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
याशिवाय 210 हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या शैक्षणिक आणि बौद्धिक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाला रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, सहसचिव कल्पेश पांढरे, प्रकल्प प्रमुख गजानन जवंजाळ तसेच सदस्य अजित वीर आणि जयदीप बोरावके यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.




