माजी उपसरपंचांनी निमगाव शाळेस दिली 50 हजाराची देणगी तर पत्नीच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थ्यांनी दिली सायकल भेट
भूमिपुत्र न्यूज
ज्या शाळेत आपण शिकलो, नवीन विश्व समजलं,उद्याची स्वप्नं पाहिली त्या ज्ञानमंदिरासाठी कृतज्ञता म्हणून निमगाव गावचे माजी उपसरपंच श्रीमंत दाजी मगर यांनी भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निमगाव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेस 50 हजार रुपयांची देणगी देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.या अनोख्या सामाजिक बांधिलकीचे निमगाव परिसरात कौतुक होत आहे. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी मारुती पवार यांनी आपल्या दिवंगत पत्नी सविता मारुती पवार यांच्या स्मरणार्थ प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यास एक सायकल भेट दिली यावेळी श्रीमंत मगर व मारुती पवार या दोघांचाही सन्मान प्रशालाचे वतीने करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष महादेव मगर होते. विचार पिठावर जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार, सहसचिव बबनराव जाधव, माजी सरपंच हनुमंत पवार,संभाजी मगर,प्रशालेचे मुख्याध्यापक ननवरे, माजी सरपंच विठ्ठल मगर,दत्तात्रय मगर,प्रताप मगर,मारुती पवार,लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ननवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत सादर केली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच मोबाईल पासून होणाऱ्या दुष्परिणामांचे गीत सादर करून उपस्थितांच मने जिंकली.सूत्रसंचालन व आभार काकासाहेब मगर यांनी मानले.
“निमगाव विद्यामंदिर निमगाव या प्रशालेस मी 50 हजार रुपयांची देणगी दिली असून हे पैसे बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. सदर रकमेवर बँकेकडून जेवढे दरवर्षी व्याज येईल त्यापासून गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख रकमेची बक्षिसे दिली जातील.”
श्रीमंत मगर,माजी उपसरपंच निमगाव