धनशैल्य विद्यालय, गिरझणी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
भूमीपुत्र न्युज
अकलूज येथील धनशैल्य विद्यालय, गिरझणी येथे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध संत, महात्मे आणि मराठी साहित्यिकांच्या वेशभूषेत सहभाग नोंदवला.मराठी ही आपली मायबोली व मातृभाषा असून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांतून दिला.
संत-महात्मे व साहित्यिकांच्या कार्याची उदाहरणे देत मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या विषयाला धरून विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे व तिचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करण्याचे मार्गदर्शन केले.
या दिनाचे औचित्य साधून विद्यालय व परिसरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. ग्रंथदिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.पारंपरिक खेळ, लेझीम आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश दिला. बालचिमुकल्यांनी संतांच्या ओव्या व अभंग सादर करून तसेच त्यांच्याविषयी माहिती सांगून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान व प्रेम निर्माण करण्यास या उपक्रमामुळे मोठी चालना मिळाली.




