मुलींनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनावे / स्वरूपाराणी मोहिते-पाटील
भूमीपुत्र न्यूज
अलीकडच्या काळात मुलींनी मोबाईलचा अतिवापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व शारीरिक आणि मानसिकदृष्टया सक्षम बनावे असे मत प्रताप क्रीडा मंडळ अकलूजच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. त्या जिजामाता कन्या प्रशालेच्या वार्षिक निकाल व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.विद्यालयातील शिक्षक कलाप्पा सूर्यवंशी यांच्या सेवपूर्ती निमित्त स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्याहस्ते त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या गिरीजा उघडे होत्या.
यावेळी या विद्यालयातील शिवांजली पवार हीने शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेत प्रथम क्रमांक व युगंधरा रामदासी हीने द्वितीय क्रमांक मिळविला तसेच अर्पिता साबळे हिने एन.एम.एम.एस परीक्षेमध्ये सुयश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित माने यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला.प्रवीण गोडसे यांनी वार्षिक निकाल वाचन केले. सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षक कलाप्पा सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्राचार्या सुनीता वाघ,पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख, स्थानिक प्रशाला समितीच्या सदस्या मनीषा चव्हाण व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय,पालक,विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्या सुनिता वाघ यांनी तर सूत्रसंचालन राजश्री कणबुर यांनी केले.