लवंग शाळेची ‘ नवरी नटली ‘ जिल्ह्यात प्रथम
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तर शोध चाचणी सन 2022-23 अंतर्गत समूह नृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या लवंग शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यातील संघांमध्ये लोकनृत्य स्पर्धा चांगलीच रंगली. यामध्ये बानु नवरी नटली…. मल्हारी पिवळा झाला हे समूह नृत्य गीत सादर करून लवंग शाळेच्या बालकलाकारांनी सर्वोत्तम कला सादर केली. अतिशय रंगतदार झालेल्या अटीतटीच्या समूह नृत्य लहान गटाच्या स्पर्धेमध्ये माळशिरस तालुक्याने पंढरपूर तालुक्यावर बाजी मारली. विजेत्या आणि उपविजेत्या बालकलाकारांना दक्षिण सोलापूरचे गटशिक्षण अधिकारी पाथरुड यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे , राजशेखर नागनसुरे, जयश्री सुतार उपस्थित होते.
विजेत्या लवंग शाळेतील बालकलाकारांना मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख नितीन साने,लालासाहेब गायकवाड, बशीर मुलाणी, दिलीप मुळे, शरद काळे, शीतल वाघ, जाविद मुलाणी या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेने मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी अभिनंदन केले.