अलिबागच्या अवघ्या ५ वर्षांच्या आयान पाटीलची राष्ट्रीय अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये गरुडझेप; देशात प्रथम!
भूमीपुत्र न्यूज
अलिबाग मधील चेंढरे येथील अवघ्या पाच वर्षांच्या आयान पाटील याने पुन्हा एकदा अलिबाग, रायगड आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘इंडियन नॅशनल एरोस्पेस अँड कॅनसॅट चॅलेंज’च्या पहिल्या टप्प्यातील अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये आयानने तब्बल ८६.६७% गुण मिळवून चमकदार कामगिरी केली आहे.
या स्पर्धेतील भारतातील सर्वात लहान स्पर्धक ठरतानाच त्याने आपल्या वयोगटात देशात प्रथम क्रमांक पटकावून दुसऱ्या टप्प्यासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.या राष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी संपूर्ण भारतातून इयत्ता चौथी ते बारावीतील सुमारे ७,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नियम आणि निकषानुसार या स्पर्धेसाठी विद्यार्थी किमान चौथी इयत्तेतील असणे अनिवार्य होते. मात्र, आयानची अंतराळ विज्ञान, रॉकेट सायन्स आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील लहान वयातील अगाध जिज्ञासा व ज्ञान पाहून निवड समितीने त्याला विशेष बाब म्हणून अवघ्या पाचव्या वर्षी परीक्षा देण्यास पात्र ठरवले.
या ऑलिम्पियाडमधील प्रश्न निव्वळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून अंतराळ विज्ञानातील संकल्पनांची समज, तर्कशक्ती, निरीक्षणक्षमता आणि वेगवान निर्णयक्षमता तपासणारे होते. अत्यंत मर्यादित वेळेत हे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान सर्वच विद्यार्थ्यांसमोर होते. मात्र, रॉकेट सायन्समधील संकल्पना स्पष्ट असल्यामुळे आणि वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापासूनच संगणक व लॅपटॉप वापरण्याचा उत्तम सराव असल्यामुळे आयानने आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.पहिला टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर आयानची निवड आता दुसऱ्या टप्प्यासाठी झाली आहे. हा पुढील टप्पा बंगळुरू येथील ‘विद्याशिल्प अकॅडमी’मध्ये पार पडणार आहे.
यामध्ये आयानला प्रत्यक्ष कॅनच्या आकाराचा उपग्रह (कॅनसॅट) तयार करणे, रॉकेटची रचना व बांधणी करणे, तसेच स्वतः तयार केलेल्या उपग्रहाचे सुमारे १०० मीटर उंचीपर्यंत प्रक्षेपण आणि चाचणी करण्याची रोमांचक संधी मिळणार आहे.या टप्प्यात इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ आणि आयआयटीचे (IIT) प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्ञानातून प्रयोगाकडे आणि प्रयोगातून प्रत्यक्ष प्रक्षेपणाकडे वाटचाल करणाऱ्या या चिमुकल्या आयानच्या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




