कोळेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या स्वाक्षऱ्यांची होणार पडताळणी; ३० जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

भूमीपुत्र न्यूज
कोळेगांव ता. माळशिरस येथे दारूबंदी करण्यात यावी, यासाठी गावातील 870 महिलांनी मा. जिल्हाधिकारी सोलापूर आणि मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्याकडे रीतसर निवेदन दिले होते. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
निबंधक व प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून, दारूबंदीच्या अर्जावर महिलांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांची अधिप्रमाणता व पडताळणी करण्यासाठी येत्या ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पडताळणी ग्रामपंचायत कार्यालय, कोळेगाव येथे पार पडणार आहे.

दारूबंदीच्या निवेदनावर स्वाक्षरी केलेल्या सर्व मतदार महिलांनी या पडताळणी प्रक्रियेसाठी स्वतःच्या मतदार ओळखपत्रासह दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबत गावात दवंडी देऊन तसेच ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून ग्रामस्थांना तारीख व वेळेची माहिती द्यावी, अशा सूचना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक एस. जी. भवड यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून, पडताळणी प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वतः पोलीस पाटलांसोबत गावातील अधिकृत मतदार यादी घेऊन उपस्थित राहावे, असे आदेश दिले आहेत.




