Uncategorized

कुंभेज येथे शहीद जवान आप्पासाहेब काटे स्मृतीस्थळाचे २४ जून रोजी लोकार्पण

भूमीपुत्र न्यूज

करमाळा तालुक्यातील कुंभेज गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यातील शूर जवान हवालदार आप्पासाहेब काटे यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीच्या स्मृती जतन करण्यासाठी ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक आणि विविध मान्यवरांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शहीद जवान आप्पासाहेब काटे स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा बुधवार दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुंभेज येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.), कर्नल सुनील राजदेव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गणेश करे-पाटील हे राहणार आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शहीद जवान आप्पासाहेब काटे यांचा जन्म ७ जून १९७७ रोजी कुंभेज येथे अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले. प्राथमिक शिक्षण कुंभेज येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये पूर्ण केले. गावातील सैनिकांचे मार्गदर्शन आणि देशसेवेची जिद्द यामुळे त्यांनी सैन्य भरतीची तयारी सुरू ठेवली.दि. ८ मे १९९९ रोजी भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी १६९ आर्टिलरी रेजिमेंटमध्ये गनर म्हणून सेवा सुरू केली. आसाम, जम्मू-काश्मीर, नाशिक आणि राजौरीसह विविध ठिकाणी त्यांनी देशसेवा बजावली. २४ जून २०१६ रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टर येथे पॅरा ग्लायडिंग युद्धसराव सुरू असताना पॅराशूट न उघडल्याने त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली आणि देशासाठी सेवा बजावत असतानाच त्यांनी वीरमरण पत्करले. त्यांचे पार्थिव कुंभेज येथे आणल्यानंतर शासकीय इतमामात व सशस्त्र सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले होते.यंदा त्यांच्या शहादतीला दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील माजी सैनिक, वीर माता-पिता, वीर पत्नी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या पश्चात वीर माता सोनाबाई काटे, वीर पत्नी राणी काटे, मुली साक्षी व श्वेता, तसेच मुलगा वेदांत असा परिवार आहे. त्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग स्वीकारला असून साक्षी काटे या केरळ येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत, तर श्वेता डी. फार्मसीचे शिक्षण घेत आहे. मुलगा वेदांत पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृती जतन करण्याचे कार्य कुंभेज ग्रामस्थांनी केले आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या त्यागातून युवकांनी देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घ्यावी. तसेच या कार्यक्रमात माजी सैनिक व वीर पत्नींच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत जास्त माजी सैनिक व विधवा भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा.

मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.)जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!