चक्क सोयाबीनच्या पोत्यांखाली लपविला होता गुटखा,वेळापूर पोलिसांच्या सतर्कतेने तस्करीचा डाव उधळला

भूमीपुत्र न्यूज
सांगोला-अकलूज मार्गावर वेळापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत अवैध गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला. प्रतिबंधक गुटखा, आयशर वाहन आणि दोन मोबाईल असा एकूण ३० लाख ८७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी बाहेरील बाजूस सोयाबीनची पोत्यांचा थर रचून तस्करांकडून तस्करीची नवी शक्कल लढवण्यात आली होती, मात्र खाकीच्या सतर्कतेपुढे तस्करांचा डाव फसला.
वेळापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पहाटेच्या सुमारास घुमेरा परिसरात गस्त घालत होते. यावेळी सांगोला-अकलूज रस्त्यावर एका अशोक लेलँड वाहनाचा (क्र. MH-42-BF-2887) पोलिसांना संशय आला.पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली तेव्हा वरून सोयाबीनची पोती रचलेली दिसली.

संशय बळावल्याने जेव्हा पोलिसांनी ती पोती हटवली असता त्यामध्ये गुटखा असलेली पोटी दिसून आली.ही पोती तपासली असता त्यामध्ये विमल पानमसाला आणि आर.एम.डी. सुगंधित तंबाखूची एकूण 62 पोती आणि 3 पुठ्ठ्याचे बॉक्स मिळून आले. याची किंमत 21 लाख 67 हजार 120 रुपये इतकी आहे. यासह 9 लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड वाहन आणि 20 हजार रुपये किमतीचे दोन विवो कंपनीचे मोबाईल असा एकूण 30 लाख 87 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल अन्न सुरक्षा विभागाने जप्त करून ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी पंचनामा सुरू केला असता, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चालक, वाहन मालक आणि माल पुरवठादार यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223,274,275,123 आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भाऊसाहेब गोसावी, पीएसआय आकाश शेळके, पोह. यशवंत आनंदपुरे, नितीन लिंगडे, बसवराज बिराजदार आणि चालक अविनाश मोरे यांच्या पथकाने केली आहे.




