माळशिरस विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५ वर्षे वयावरील मतदारांचा गृह टपाली मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद
भूमीपुत्र न्यूज
२५४ माळशिरस विधानसभा(अ. जा)मतदार संघात ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे जेष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता.
त्यासाठी दि.२६ ते २८ एप्रिल या कालावधीत १८ पथकांनी या मतदारांच्या घरोघरी जाऊन विहित पद्धतीने मतदान करून घेतले. यात पहिल्या दिवशी ८५ वर्षे वयावरील १४२ तर १५ दिव्यांग मतदारांनी मतदान केले.दुसऱ्या दिवशी ८५ वर्षे वयावरील १४७ तर १५ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर शेवटच्या दिवशी गैरहजर मतदारांपैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही.
३३९ पैकी ८५ वर्षावरील २८९ तर ३० दिव्यांग अशा एकूण ३१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारणारे १० ज्येष्ठ मतदारांचे मतदानाच्या हक्क बजावण्यापूर्वीच निधन झाले.गृह टपाली मतदानासाठी एकूण शंभर जणांची नियुक्ती करण्यात आली होती सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गावोगावी घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात आली .यासाठी माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री सुरेश शेजुळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया राबवली .
माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील मतदान केंद्र क्रमांक १२८ मधील ज्येष्ठ मतदार नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अवघ्या एका तासातच त्यांचा मृत्यू झाला.