निमगावात बिबट्याचा पुन्हा एकदा धुमाकूळ ….मगर यांचा बकरा केला फस्त
भूमीपुत्र न्यूज
निमगाव येथे 6 जून 2023 रोजी बिबट्या आढळून आल्यानंतर तोच बिबट्या पुन्हा 18 जून रोजी पुन्हा एकदा दिसून आला होता आता या बिबट्याने निमगाव मळोली शिवेवरचा परिसर सोडून निमगाव गावच्या पश्चिमेला असणाऱ्या खंडोबा मंदिराकडे त्याचा वावर आढळून आला असून सोमवार दि 3 जुलै च्या रात्री अमोल चंद्रकांत मगर यांच्या एक वर्ष वयाच्या बकऱ्यावर हल्ला करून बकऱ्यास ठार केले आहे.
माळशिरस वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे हे सोमवारी निमगाव येथे आले असता एकूणच या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, निमगाव व परिसरात आढळणारा प्राणी हा बिबट्या असून वन विभागामार्फत त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अशा परिस्थितीत लोकांनी रात्रीच्या वेळी एकटे घराबाहेर पडू नये आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे रात्री घराबाहेर पडताना व शेतात जाताना हातात बॅटरी व आपल्याजवळ असणाऱ्या मोबाईलवर मोठ्याने गाण्याचा आवाज करून जाणे म्हणजे हा बिबट्या त्या ठिकाणी येणार नाही .
एकूणच या बिबट्याच्या निमगाव व परिसरातील पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागामार्फत जास्तीचे प्रयत्न करून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी होत आहे