नारी शक्ती शिवाय राष्ट्राचा विकास अशक्य/ दिलीप स्वामी ,मुख्य कार्यकारी अधिकारी
भूमीपुत्र न्यूज
सुदृढ समाज निर्मितीसाठी महिलांनी स्वतःच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहुन आरोग्य संपन्नतेने संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात स्त्रीशक्तीचे मोठे योगदान आहे नारी शक्ती शिवाय राष्ट्राचा विकास अशक्य आहे असे मत सोलापूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
शंकरनगर ,अकलूज येथील स्मृतीभवनात पंचायत समिती माळशिरसच्यावतीने महिला सक्षमीकरण व गुणवत्ता वाढ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वामी बोलत होते. कार्यक्रमासाठी ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील,पिंक रीव्हाल्युशन च्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी हरीश राऊत,हर्षवर्धन नाचणे,श्री शंके, प्रकल्प अधिकारी बालाजी अकोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, नारीशक्ती शिवाय देशाचा राष्ट्राचा विकास अशक्य आहे.महिला मुळातच सक्षम असते आपणही उपस्थित सर्व महिला सक्षम आहात फक्त काही मुद्द्यांना अधोरेखित करणे गरजेचे आहे त्यामध्ये महिलांनी स्वतःच्या जीवनाकडे लक्ष द्यावे,भाषणशैली सकारात्मकता,वाचन वाढवावे या गोष्टी केल्यास तुम्ही संस्कारीत विद्यार्थी घडवणार असून त्यातूनच उद्याचा इतिहास घडविणा-या ठरणार आहात.
यावेळी शितलदेवी मोहिते पाटील यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे गरजेचे आहे असे सांगून डॉटर मॉम फाउंडेशनच्यावतीने एकुण चार हजार सायकल पैकी २५० सायकली देत असल्याचे जाहीर करुन येत्या जूनअखेर सर्व सायकली देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून गर्भाशयाच्या मुखाचे व इतर कॅन्सरची माहिती देत पिंक रिव्होल्यूशन च्या वतीने मोफत देण्यात येणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सर लस घेण्याबाबत आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी मानले.