निमगाव ग्रामपंचायतचा निलंबित कर्मचारी अफसर शेख यांच्या विरोधात वेळापूर पोलिसात गुन्हा दाखल

भूमीपुत्र न्यूज
निमगाव (म) ता माळशिरस ग्रामपंचायतचा कर गोळा करणारा कर्मचारी अफसर अल्लाउद्दीन शेख रा निमगाव म. याने ग्रामपंचायत कार्यालय निमगावचे अधिकृत सही शिक्याशिवाय पावती पुस्तक प्राप्त करून त्यावर निमगाव ग्रामस्थांकडून 22806/- रुपये एवढी रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी गोळा करून सदर रकमेचा ग्रामपंचायत कडील सदस्यांच्या परवानगीशिवाय अपहार केला म्हणून निमगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे यांनी वेळापूर पोलिसात भारतीय दंड संहिता 1860 कलम 408 अन्वये मंगळवार दि 7 फेब्रुवारी 2023 रोजी वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की ,निमगाव ग्रामपंचायतीमध्ये गावातीलच अफसर शेख ,शंकर कस्तुरे, अमोल कुंभार, राहुल तोरणे, शिवमल्हार गायकवाड असे कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपाचे कामास आहे पैकी अफसर शेख हा ग्रामपंचायत कार्यालयाकडे भरण्यात येणारे कर, भाडेपट्टा ,पाणीपट्टी ,घरपट्टी ,गाळेपट्टी वगैरे पैसे गोळा करून गोळा केलेल्या पैशाची पावती देऊन सदर पैसे बँकेत भरण्याचे काम करीत होता परंतु मी कैलास सुरवसे 21/ 12/ 2022 रोजी ग्रामपंचायत निमगाव चे कार्यालयात दैनंदिन कामकाज करीत असताना जुने कॅशबुक व जुने रेकॉर्ड पहात असताना असे निदर्शनास आले की, अफसर शेख याने निमगाव कार्यालयाकडील कर वसुलीचे खोटे पावती पुस्तक स्वतःच्या ताब्यात प्राप्त करून त्यावर कोणत्याही प्रकारचा कार्यालयाचा अधिकृत सही शिकल्याशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्रामपंचायत कार्यालयाचा कर वसुलीच्या रकमेचा अपहार केल्याबाबत व सदर पावती पुस्तकावरील पावत्या फाडून अंदाजे 22806/- रुपयाचा अपहार केले बाबत व त्याच्यावरील खातेनिहाय चौकशीमध्ये तो दोषी आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यास फिर्याद नोंद केली आहे.




