राजेवाडी कारखान्या विरोधात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची सहकार मंत्री व साखर आयुक्तांकडे तक्रार
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सीमेलगत व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सदगुरू श्री श्री श्री साखर कारखान्याच्या ऊस तोडणी व वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणुकीबाबत कारखान्याचे पदाधिकारी, चेअरमन यांनाही सदरची तक्रार केली असता त्यांच्याकडूनही उलट शेतकऱ्यास होणारी दमदाटी व धमकी याबाबत मावळ मतदार संघ ,(पुणे रायगड) खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे मोटेवाडी ता माळशिरस येथील अन्यायग्रस्त शेतकरी बाळासाहेब शंकर वाघमोडे यांच्या समर्थनार्थ तक्रार दाखल केल्याने कारखान्यावर कारवाई होणार का ? याकडे राज्यासह माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .
शेतकरी बाळासाहेब शंकर वाघमोडे यांची मोटेवाडी ता माळशिरस येथे शेतजमीन आहे ते सदगुरू श्री श्री श्री साखर कारखाना या कारखान्याचे सभासद असून गेली 5 ते 7 वर्ष नियमित या कारखान्यास ऊस पुरवित आहेत परंतु गेले 2 वर्षापासून सदर कारखान्याचे ऊस तोडणी व वाहतूकदार ऊस तोडणी करीता पैसे घेत आहेत सन 2023-24 च्या ऊस तोडणीसाठी वाहतूकदार कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने एकरी 3 ते 5 हजार रुपये, ड्रायव्हर भत्ता 300 रुपये आणि जेवणाची मागणी करीत आहेत या सर्व गोष्टी संबंधित शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी अगोदर ठरवून घेत आहेत शेतकरी यास तयार झाला नाही तर त्या शेतकऱ्याचा ऊसतोड करीत नाहीत याबाबत कारखान्याचे शेतकी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास तेही टाळा टाळ करीत आहेत
कारखान्याचे पदाधिकारी, चेअरमन यांनाही सदरची तक्रार केली असता तेही उलट शेतकऱ्यास दमदाटी करीत असून कुणाकडेही तक्रार करा असा धमकीवजा सल्ला देत आहेत या सर्वांचीच मिली भगत असून शेतकऱ्यास लुटण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे अशी तक्रार शेतकरी बाळासाहेब वाघमोडे यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबावी व योग्य ती कारवाई करावी असे पत्र राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे
या ना त्या कारणाने सतत चर्चेत असणाऱ्या राजेवाडी कारखान्यावर सन 2021- 22 च्या जाहीर केलेल्या उर्वरित देय रकमेसाठी शेतकऱ्यांनी सन 2022 – 23 च्या गाळप हंगामाच्या सुरुवातीसच मोर्चा काढला होता या अगोदरही मळोली ता माळशिरस येथील शेतकऱ्यांनी वजन काट्या बाबत प्रश्न उपस्थित केला होता आणि सध्या ऊस तोडणीसाठी अवाजवी पैशाच्या मागणीबाबत तक्रार थेट सहकार मंत्री व साखर आयुक्तांकडे गेल्यामुळे राजेवाडी कारखान्याच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे
अन्यायग्रस्त शेतकरी बाळासाहेब वाघमोडे यांनी साखर आयुक्तांना पत्र दिल्यानंतर राजकीय दृष्ट्या सक्षम असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील नेतेमंडळी व शेतकरी संघटनांनी त्यांची बाजू घेऊन कारखाना प्रशासनास जाब विचारणे अभिप्रेत असताना मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना याबाबीत लक्ष घालावे लागले हे माळशिरस तालुक्याच्या राजकीय विश्वासहार्यतेवर प्रश्न निर्माण करणारे ठरेल असे बोलले जात आहे
कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणी व वाहतुकी साठी पैसे घेऊ नका अशा सक्त सूचना व पत्र तोडणी व वाहतूकदारांना दिले आहेत शेतकरी बाळासाहेब वाघमोडे यांच्यात व तोडणी, वाहतूकदारांमध्ये कारखान्याच्या परस्पर काही विषय झाला असेल तर तो कारखाना प्रशासनास माहित नाही परंतु ऊस तोडणीसाठी व वाहतुकीसाठी पैसे घेतल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल
एन शेषागिरी राव, चेअरमन सदगुरू श्री श्री श्री साखर कारखाना राजेवाडी