अकलूज स्टेट बँकेतील महिला कर्मचाऱ्याच्या अरेरावी विरोधात विविध संघटना आक्रमक
भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील भारतीय स्टेट बँकेतील एका हंगामी महिला कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून शेतकरी व ग्राहकास अरेरावीची भाषा वापरून सातत्याने त्रास दिल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उबाठा) अकलूज शहर भाजप ,युवा सेना ,यासह मैत्री प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष नीता सुळे व मराठा सेवा संघ यांनी भारतीय स्टेट बँकेतील शाखाधिकारी यांना निवेदन देऊन या हंगामी महिला कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा शुक्रवार दि 29 सप्टेंबर पासून बँकेच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अकलूज येथील भारतीय स्टेट बँकेत सातत्याने या ना त्या कारणाने शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते ज्या खिडकीवर ज्या ग्राहकाचे काम आहे त्या खिडकीवरील संबंधित हंगामी महिला कर्मचारी ग्राहकाचे काम न करता खाजगी व्यक्तीस काम करण्यास सांगण्यात येते व ग्राहकांना तासनतास रांगेत उभा केले जाते याबाबत बँकेच्या संबंधित शाखाधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडवा उडवीची उत्तरे दिले जातात .याउलट संबंधित हंगामी महिला कर्मचाऱ्यां कडून ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरली जाते.गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अकलूजच्या स्टेट बँकेत हा प्रकार सुरू आहे परंतु बँक अधिकारी या हंगामी महिला कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत आहेत.
संबंधित हंगामी महिला कर्मचारी जाणीवपूर्वक गेल्या चार ते पाच वर्षापासून सातत्याने एकाच टेबलवर काम करून ग्राहकांचे असणारे गोपनीय पिन कोड नंबर इतर बँकेशी संबंधित नसणाऱ्या खाजगी व्यक्तीकडे देत असल्याने भविष्यात या गोपनीय क्रमांकाचा गैरवापर होऊन संबंधित शेतकऱ्यास व खातेदारास आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो यामुळे अशा या हंगामी महिला कर्मचाऱ्यास तात्काळ बदली करावी अन्यथा शुक्रवार दि 29 सप्टेंबर रोजी बँकेसमोरील आंदोलन अटळ असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी दिली